मैत्रीण

ये...ऐक थांबशील का जरा,नवीन प्रश्न आहेत काही
तुझं शेजारी बसणं गरजेचं आहे बघ आता 
वजा होत चाललोय ग जरा,अधिक आहे तुझ्यापाशी
तुझं माझ्यासमोर असणं बेरजेच आहे बघ आता

डोकं धरलय ग,एवढं की प्रश्न ही कळत नाहीये
त्याच ठिकाणी जाऊन जाऊन सारं काही थकलय
उत्तर अशी समोर दिसतायत पडलेली,मीच टाकलेली
पण रटाळ असतील,आहेत म्हणून त्यांना तसच फेकलंय

तुझं असणं,तुझं दिसणं,तुझं येऊन,विचारून सोडवणं
सगळं माहीत असताना
माझ्या त्याच चुका अन् नंतर येणारा पश्चाताप
सगळं बेक्कार असताना...तू थांबलेली असतेस

कळतं मलाही,पण वळत काही एक नाही
घड्याळ्याच्या काट्यासारख,चकवत चाललेल्या वाटा घेत
तिथं आणि परत तिथेच जायला जमत फक्त
नंतर मान खाली घालुन तुझ्याच आसऱ्याला येतो
वाट बघत तुझी,थांबलेला असतो खेटे घेत
तू आली की,परत कसा चुकलो हे सांगायला करमत फक्त

तुझं येणं,तुझं शेजारी बसणं,खांद्यावर हात टाकून
चल! सांगशील का आता म्हणणं...अंदाज नसताना
लहान लहान कारणं घेऊन, मी गिरक्या घेत बसणं
अन् सरळ रेष टाकून त्यात..तू उत्तर दाखवतेस

कळतं मलाही पण वळत काही एक नाही
चिखलात रुतून,कमळ होण्याचा भोग येईल म्हणत
गाळ उरतो फक्त,आणि तेच व्हायला जमत फक्त
नंतर तसाच उठून येतो तुझ्या दाराजवळ,ठोठावतो
दारात उभं राहून,तुझ्या टोमन्यांचा रोख येईल म्हणत
जाळ उरतो फक्त,आणि तोच घ्यायला जमत फक्त

ये...ऐक थांबशील का जरा,नवीन प्रश्न आहेत काही
तुझं शेजारी बसणं गरजेचं आहे बघ आता 
वजा होत चाललोय ग जरा,अधिक आहे तुझ्यापाशी
तुझं माझ्यासमोर असणं बेरजेच आहे बघ आता



Post a Comment

8 Comments