वाहून जायचं

करायचं तर सगळं सोडून फक्त एकच करायचं
बुडलं तरी चालेल पण त्यातच वाहून जायचं

झोप आली तर मोडायची
सारखं रडायची सवय सोडायची
यश आलं म्हणून नाय लगेच उडायचं
अपयश घ्यायचं चालत रहायचं

गुडघे वाकवायचे तर माती हातात घ्यायला
मान वाकवायची ती मोठ्याना मान द्यायला
डोकं झुकवायचं तिथंच, जिथं बाप उभा असेल
लहान व्हायचं कधीतरीच, जिथं आपली आई दिसेल

मित्र ठेवायचा असा जो तूझ्यासाठी सुदामा असेल
हृदय ओवाळून टाकायचं, जिच्यात तुला राधा दिसेल
मैत्री करायची, प्रेम करायचं वेडं होऊन करायचं 
बुडलं तरी चालेल पण त्यातच वाहून जायचं
 
देह पिडेल आरामासाठी तर पिडू दे
भूत येतील पाठी, त्यांना तसच सडू दे
लोकं नडतील फायद्यासाठी,  नडु दे
धोबीपछाड करेल आयुष्य, पाडू दे

करायचं तर सगळं सोडून एकच करायचं
मरायचं तर त्याच कारणापायी मरायचं
पात्र घाबरवेल तुला नदीचं भावा लय
बुडलं तरी चालेल, पण त्यातच वाहून जायचं

करायचं तर सगळं सोडून एकच करायचं
बुडलं तरी चालेल, पण त्यातच वाहून जायचं


Post a Comment

2 Comments

Unknown said…
खुपच सुंदर…..