पडक्या भिंती, पडलेलं छत, पडक्या दरवाज्याची चौकटं
तू राहिलेल्या घराचा सांगाडा उरलाय आता फक्त
तुझी जागा वाऱ्याने घेतलीये,
पडक्या भिंतीत वाऱ्यासारखा धावत असतो
गच्ची आता कशाची उरलीये
मोकळं छप्पर रात्री चांदणं दाखवत असतो
पायऱ्यांवर तुझ्या पैंजनांचा आवाज येत नाही आता
साखर संपली म्हणून तू ही दारावर येत नाही आता
पायऱ्यांवर बसायला भटकी कुत्री येत असतात
साखर घेऊन बिनकामीचे शेजारी जातं असतात
पावसात वाळणं काढायला लगबग होत नाही आता
तुझ्या घरात आधीसारखी गडबड होत नाही आता
धो धो पाऊस नुसत्या भिंती पाडत असतो
आपल्या आठवणी त्याच चिखलाखाली गाडत असतो
आता तुमच्या गोंधळाने झोपमोड होत नाही
दावे घेऊन फांद्यांची मोडतोड होत नाही
झोके बांधायला नसतंच हल्ली कोणी
उंच झोका घ्यायची तूझी धडपड दिसत नाही
कधीतरी ये तू...या पडक्या भिंती उभारू
छत टाकू चौकटीत दरवाजा उभा करू
तू धाव मग पैंजण वाजवत, घरात, पायऱ्यांवर
हाक दे आणि साखर घेऊन जा उधारीवर
पण ये तू..हवं तर मी बांधेल तुला झोका
नसता एकदा सांग तरी...काय झाल्या माझ्या चुका ?
3 Comments