पडक्या भिंती पडकं छत आणि दरवाज्याची चौकट
तू राहिलेल्या घराचा सांगाडा उरलाय आता फक्त
तुटक्या गंजक्या खिडकीतून तू दिसत नाहीस आता
रस्त्यावर बघून पडद्यामागून कोणी हसतही नाही आता
वारा आजही तुझ्याच वेगाने आत जात असतो,
मोडक्या तोडक्या खुर्च्या,मोडक्या तोडक्या फळ्या
तुझ्या जुन्या वह्यांची उडती पानं दाखवत असतो
तुमच्या नळावर आता बायकांचं भांडण होत नाही
कळश्या हंडे घेऊन पोरींचं तंडण होत नाही
पाणी आलं की मोटरा चालू होतात, हौद भरले जातात
पाण्यासाठी घागरी घेऊन आता झोंबन होत नाही
तुमच्या दारात कोणी सूर खेळत नाही आता
शिवाशिवीचं राज्य घेऊन तू ही पळत नाही आता
सिमेंटच्या रस्त्यावरून आता धूळ उडत नाही
संध्याकाळी आता तुझ्याकडून सडा पडत नाही
गणितातल्या शंका माझ्या तशाच आहेत अजून
वही पेन घेऊन तू सांगायलाच येत नाही
इतिहास सांगत बसायचीस तू, लक्षात आहे अजून
तू नसता शास्त्रासारखं मला वागायलाच येत नाही
कट्ट्यावर तुमच्या आता गर्दी दिसत नाही
तिथं येऊन गल्लीच संपते,मी ही बसत नाही
तिथं चहा प्यायला-द्यायला नसतंच कोणी
चहा करायला गेलेली...तू काही दिसत नाही
तुझी वाट बघून मी निघायला घेतो शेवटी
तीन पावलं चालून तुझा आवाज येतो पाठी
भास नुसता भास ...आजही तुझा आवाज
मला हवा तसा वागवत असतो
त्या पडक्या दगड भिंतीत
भूतकाळाचा आरसा दाखवत असतो
कधीतरी ये तू...या पडक्या भिंती उभारू
आपला कट्टा पहिल्यासारखा करू
वह्या घेऊन आयुष्याची गणितं सोडवत बसू
एक एक करत माझ्या शंका खोडतं बसू
पण ये तू....म्हणशील ते ऐकेल तुझं
नसता एकदा सांग तरी...नेमकं काय चुकलं माझं
1 Comments