पडक्या भिंती,पडकं छत,पडक्या दरवाज्याची चौकट
तू राहिलेल्या घराचा सांगाडा उरलाय आता फक्त
दिवाळीच्या सुट्टीला म्हणावी तशी गर्दी दिसत नाही
मी आलो तरी पायरीवर वाट बघत कोणच बसत नाही
मी नेहमीच उतरत असतो त्याच पाच च्या गाडीतुन
उशीर केला,विसरून गेला म्हणून तू ही कोसत नाहीस
सकाळी तुळशीसमोर तू दिसत नाहीस आता
आणि म्हणून मी ही छतावर बसत नाही आता
वारा आजही त्याच वेगाने अंगणात जात असतो
तुझ्या खुणा सापडल्या नाहीत मला येऊन सांगत असतो
तू माझ्या हाताने लावलेली झाडं, मरून गेली आता
त्यांची फुलं मरणावर टपलेल्या किड्यांना सरून गेली माय
मी खतपाणी घातलं तुझ्या आवडत्या सुर्यफुलांना, जमलं नाही त्यांना
ती सगळी झाडं तू गेली तशी विरून गेली बाय
ज्या घराच्या चौकटींतुन बोलवायचो मी तुला
त्यांना भुंगे लागलेत आता
तुझ्या उत्तरापेक्षा त्याचाच आवाज जास्त असतो
तुमचं गंजकं गेट वाजलं म्हणून धावत जातो मी तर
तिथं तुळशीखाली पडलेला बेवडा सुस्त असतो
तुझी वाट बघून मी निघायला घेतो शेवटी
तीन पावलं चालून तुझा आवाज येतो पाठी
भास नुसता भास ...आजही तुझा आवाज
मला हवा तसा वागवत असतो
त्या पडक्या दगड भिंतीत
भूतकाळाचा आरसा दाखवत असतो
कधीतरी ये तू...ते सगळं भुस्कट बाजूला सारू
तुझी आवडत्या वेली लावून,परसबाग पुन्हा उभारू
त्या सुर्यफुलाला जगवलय मी, तू आली म्हणून त्याची मान तरी वर होईल
तू आली तर ती तुळस पण थोडा मोकळा श्वास घेईल
तुला बोलावलं तरी तू येणार नाहीस आता,
माझ्या चुका तुझ्या परतीच्या वाटेत असतात
लाख उठतात माणसं जिवंत,
मूडदे थोडीच उठत असतात
5 Comments