स्वीकार आहे.....


त्या भिजल्या वाटांवर उभं रहावं तुझ्यासाठी..
अगदी अंतापर्यंत
होकार नकारातला फरक नगण्य होईपर्यंत
असं जीवन जरी आलं 
तरी स्वीकार आहे हसत हसत
एकदा तुझ्या नजरेत यावं ओलाचिंब दिसावं बस्स !

त्याच भिजल्या वाटांवर चालायला घ्यावं तुझ्यापाठी.. अनंतापर्यंत
जीवन मरण यातला फरक शून्य होईपर्यंत
मग मरण जरी आलं 
तरी स्वीकार आहे हसत हसत.. 
तू एकदा वळून बघावं फक्त, बघून हसावं बस्स !

त्या भिजल्या वाटेवर बोलायला घ्यावं तुझाशी..अबोला येईपर्यंत
मुका बोलक्यातला फरक शून्य होईपर्यंत
मग मुकं व्हावं लागलं 
तरी स्वीकार आहे हसत हसत
तू बोलत रहावं मी ऐकत रहावं बस्स !

त्या भिजल्या वाटेवर भिजायला घ्यावं तुझ्यासोबत...पाऊस जाईपर्यंत
तुझ्या माझ्यातला फरक नगण्य होईपर्यंत
मग तुझं व्हावं लागलं 
तरी स्वीकार आहे हसत हसत
एकाच छत्रीखाली रहावं, वाटेल तेव्हा भिजावं बस्स !

Post a Comment

4 Comments