सुवर्णमध्य


पाऊस आलेला त्या दिवशी
गर्दी धावत होती आडोशासाठी 
मागे आलेला इंद्रधनुष्य अन् मी चालत होतो
भिजल्या रस्त्यावर काळ्या रेनकोटपाठी
 
आकाशी जरासं ऊन होतं, त्या दिवशी 
त्याची पावसाशी स्पर्धा होती चेहऱ्यासाठी
वारा मंद, मातीचा सुगंध अन् मी चालत होतो
भिजल्या रस्त्यावर काळ्या रेनकोटपाठी
 
कट्टे मोकळे होते, लॉन रिकामा
त्या दिवशी भांडणं नव्हती बाकड्यासाठी
तिची सावली अन् मी चालत होतो
भिजल्या रस्त्यावर काळ्या रेनकोटपाठी

नेमकं काय कळत नव्हतं त्या दिवशी
नुसतीच पायपीट माहीत नाही कशासाठी 
निरुत्तर, बिनाछत्री मी भिजत चालत होतो  
भिजल्या रस्त्यावर काळ्या रेनकोटपाठी

ना ती सुरुवात होती
ना तो अंत होता...
भिजल्या रस्त्यावर काळ्या रेनकोटपाठी
तो सुवर्णमध्य होता

तो सुवर्णमध्य होता........

#FromPrathameshChem


Post a Comment

3 Comments